छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना तलाठी पदाचे आमिष दाखवून ४१ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. भामट्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून दोन उमेदवारांना बोगस नियुक्ती आदेश दिले. आरोपींनी उमेदवारांना बनावट ओळखपत्रे आणि टॅब वाटप करून शासकीय आवारातच त्यांचे बनावट प्रशिक्षणही पूर्ण करून घेतले. हा गंभीर प्रकार २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालय परिसरात घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदारावर सिटी चौक पोलिस ठाण्यात
फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिनाथ ज्ञानेश्वर वरकड (रा. मावसाळा, ता. खुलताबाद) आणि अक्षय साईनाथ गायकवाड (रा. एन-२, सिडको) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.
त्यानुसार, अजिनाथ यांच्या पत्नी अश्विनी तुपे आणि अक्षय यांचा भाऊ स्वप्नील गायकवाड यांना तलाठी पदावर नियुक्ती झाल्याचे भासवण्यात आले. १० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना बनावट ई-मेलवरून बोगस नियुक्ती आदेश पाठवण्यात आले. मात्र, १३ ऑगस्ट रोजी जेव्हा या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पडताळणी केली, तेव्हा पायाखालची वाळूच सरकली. हे आदेश पूर्णपणे बनावट असल्याचे तिथे उघड झाले. त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













